03

झिंग झिंग बार

झोपेतून जागं झाल्यावरच्या भाव-भावना हे रात्रीच्या भावनांचं प्रतिबिंब असतं असं म्हणतात. रात्री चांगल्या मूडमधे झोपलो तर सकाळ ताजीतवानी होते आणि रात्री मूड घालवून झोपलो तर त्याची गडद छाया सकाळवर पडते. हा अनुभव प्रत्येकालाच कैक वेळा आला असेल. 

काल रात्री जेवताना चंद्र तावदानातून डोकावत होता. त्याच्या शीतल प्रकाशाने हिमालय अधिकच थंडावला. टिपूर चांदण्यात चालण्याचा मोह अनावर झाला आणि आम्ही  मोजके पाच सात जण शतपावली करायला निघलो. डावीकडे अजस्त्र डोंगर आणि उजव्या हाताला पाताळवेरी गेलेली खोल दरी, अतृप्त मनाला तृप्त करणारी शांतता, शरीराला झोंबणारा गार वारा आणि साथीला "तोच चंद्रमा नभात " !! मन शांत की झोप शांत! त्यामुळे सकाळ ताजीतवानी झाली. 

आजही निवांत आवराआवर करून निघालो. आज आमची वस्ती होती 'झिंग झिंग बार' ला. 

 दरीतून वाहणारी 'भाग नदी' पाठराखण करणाऱ्या माहेरवाशिणीसारखी सतत आमच्या बरोबर होती. वळणदार रस्त्यावरून मार्गक्रमण चालू होतं. सापाची कंबर पण लचकेल असे नागमोडी रस्ते. BRO (Border Roads Organisation) ला शतशः नमन! इतक्या उंचीवर, खराब आणि विरळ हवेत इतके सुंदर रस्ते बांधले आहेत आणि अव्याहत काम चालू आहे. 

आमचा प्रवास टप्प्या टप्प्यानी चालला होता. पुढचा टप्पा होता 'दारचा पूल '. 

'दारचा पूल' हा भारतातील दुसऱ्या क्रमांकाचा लांब पूल, तर हिमाचलमधला प्रथम क्रमांकाचा लांब पूल! पुलावर गाडी थांबवली. भरपूर फोटो काढले आणि निघालो ते थेट 'दीपक ताल' या सुंदर ग्लेशिअर लेकला. ह्या आरसपानी तलावापाशी थांबून परत एकदा फोटो आणि आता भरीला रील बिल. हल्ली फोटोबरोबर रील आणि मोबाईलसमोर 'स्वगत ' हे सगळ्याच्या आयुष्याचा भाग झालाय. दीपक तालचं नितळ, वाऱ्यावर नाचणारं पाणी, वार्‍याचा अन् काठावर येऊन फुटणाऱ्या लाटेचा चुबळुक चुबळुक आवाज. ऐकत, बघत बसलो की ब्रम्हानंदी टाळी सहज लागेल. मारून मुटकून ध्यानाला बसण्याची गरजच नाही. सहजच ध्यान लागेल. 

मुख्य रस्ता सोडून आमच्या ड्रायव्हरने गाडी डावीकडे टाकली. ज्या रस्त्यावरून आपण कार चालवायचा विचार पण करणार नाही अश्या या ऑफरोडला त्यांने टेम्पो ट्रॅव्हलर घुसवली. थोडया वेळापूर्वीच झालेल्या जेवणाचा पोटात गोपाळकाला झाला. आजच्या मुक्कामी ' झिंग झिंग बार 'ला सगळे पोचलो. झिंग झिंग बार हे फक्त नाव आहे, वास्तवात इथे फक्त उघडेबोडके डोंगर आणि थंडी आहे. 

आमच्या आधी पोचलेल्या आमच्या क्रूने टेंट-बिंट लावून टाकले होते. चहूबाजूंनी निष्पर्ण डोंगर, त्यांच्या पायातून जाणारा नॅशनल हायवे, त्याच्या खाली काही शे फुटांवर आमची कँप साइट आणि आमच्या कँपपासून हाकेच्या अंतरावरून वाहणारा झरा. आमची कँप साइट अगदी डोंगराच्या कोंदणात वसवली होती. टेन्टमध्ये सॅक टाकून सगळे डायनिंग टेन्टमध्ये शिरलो. चहा कॉफी आणि भज्यांवर हात मारला. 

 हिमालयातल्या ट्रेकिंगचा एक नियम आहे "Climb high and sleep at low. उंचीवर चढून खाली आलात की मग झोपायला परवानगी. यामुळे आपल्या शरीराला विरळ हवामानातल्या वातावरणाशी मिळतंजुळतं घ्यायला मदत होते. असं केलं नाही तर "AMC" म्हणजे Acute mountain seekness होण्याची शक्यता दाटते. छातीत पाणी जमा होणे किंवा मेंदूत पाणी जमा होणे असे जीवघेणे आजार होऊ शकतात. हे टाळण्यासाठी आम्ही लगेच जवळ असलेल्या टेकडीवर height gain साठी जायला निघालो.

जसे बायकांचे मूड कधी आणि कशावरून बदलतील हे सांगणं कठीण तसंच हिमालयातलं हवामान कधी बदलेल सांगणं कठीण. म्हणून छोट्या सॅकमध्ये उबदार जॅकेट आणि रेनकोट घेतला. दहा पावलं चालल्यावर पायवाट दगड धोंड्यात गायब झाली. वाट अशी नाहीच. आपण जाऊ तो मार्ग. सगळं terrain सुट्ट्या दगडांनी भरलेलं होतं. जमिनीवर पण डोंबाऱ्याचं अवधान ठेवून चालावं लागत होतं. जसजसं वरवर जाऊ लागलो तसतसा आमचा कँप ठिपक्यासारखा तर त्याच्या शेजारचा झरा चांदीच्या सरी सारखी दिसायला लागला. आता सगळ्यांची चाल मंदावली, श्वास जड व्हायला लागले. उंचीचा परिणाम जाणवायला लागला. ठरवलं होतं तेवढ्या उंचीपर्यन्त सगळे आलो होतो.  हवामानाची मर्जी फिरली, रिमझिम पाऊस यायला लागला. कँप साइटवर पोचेपर्यन्त चार वेळातरी रेन कोट घातला आणि काढला असेल. उंचावर जाऊन आल्यामुळे सगळ्यांना खूप बरं वाटलं. 

 आजची टेन्टमधली पहिली रात्र ! आता खऱ्या अर्थाने मोहिमेला आल्यासारखं वाटतंय. 'ए फ्रेम' टेन्टमध्ये आम्ही तिघेजण होतो. स्वतःच्या खोलीऐवजी टेन्ट, गादीऐवजी कॅरी मॅट आणि सवयीच्या पांघरूणाऐवजी स्लीपिंग बॅग मध्ये अळीसारखं घुसून झोपणं हे माझ्यासाठी नित्याचं पण बाकीच्यांसाठी त्रासाचं होतं. पण आपल्या comfort zone मधून बाहेर येण्यात जी मज्जा आहे, ती सगळ्यांनी पुरेपूर एन्जॉय केली.

मधेच रात्री चक्कर मारायला बाहेर आलो. सकाळी काळे-ठिक्कर दिसणारे डोंगर चंद्रप्रकाशात न्हाऊन उजळले होते. 

चंद्राला परप्रकाशी म्हणणं हे त्याला हिणवण्यासारखं वाटतं. चंद्र म्हणजे सूर्याचा दाहक प्रकाश शीतलतेत रूपांतरीत करणारा जादुगार वाटतो मला! झऱ्याच्या आवाजात चंद्रप्रकाशात चालणं ह्यासारखं सुख नाही. मनमुराद चालून झाल्यावर टेन्टमधे घुसलो.

Write a comment ...

Write a comment ...

Trinity Outdoors & Tours

Pro
Trinity Outdoors and Tours organise one day and overnight treks, adventure activities, children camp and pilgrim and leisure tours. We determined to become leading company in tourism with business ethics and loyalty.