सकाळी नाश्ता करून आमच्या युनाम मोहिमेच्या बेस कँपला निघालो. "बारचा ला" पूल आणि "सुरज ताल" ओलांडून आम्ही आमच्या बेस कँपवर "भरतपूर" ला पोचलो. भरतपूर या नावावरून हे एक वसलेलं गाव वाटेल, पण असं काहीही नाही. रस्त्यावर दोन तीन ढाबे म्हणजे भरतपूर. रस्ता आणि डोंगरामध्ये 4-5 क्रिकेटची मैदानं मावतील येवढी जागा, त्यातून वाहणारी नदी. पाणी जेमतेम पोटरी इतकं. त्याच्या काठावर आमचा कँप. आणि समोर आमचं लक्ष, "युनाम" शिखर.
ट्रेकर ही एक जाम जुगाडू जमात! जे मिळेल त्यातून, हवं त्याची निर्मिती करणार. नदीतील दगडांचं देऊळ आणि त्याच दगडातून कृष्ण, बलराम आणि सुभद्रा साकारले. 'जेथे जातो तेथे तू माझा सांगाती' !! कृष्णाच्या सानिध्याची परत एकदा प्रचिती आली. एकदा का त्याचं बोट पकडलं की तोच आपला हात शेवटपर्यंत घट्ट धरून ठेवतो.
आज मात्र टेन्ट आम्हीच लावले. बऱ्याच जणांचा टेन्ट लावण्याचा पहिला अनुभव होता. आम्ही आता साधारण १४,००० फुटांवर होतो. त्यामुळे प्रत्येक छोट्या छोट्या कामाला खूप कष्ट पडत होते. रात्री स्लीपिंग बॅगमधून उठून टॉयलेट टेन्टपर्यन्त जाणं जिवावर येत होतं.
सूर्याला मित्र का म्हणतात हे हिमालयात गेल्यावर कळतं. शरीर गोठवणाऱ्या थंडीत गडद ढगांमधून जेव्हा सूर्यकिरण अंगावर पडतात तेव्हा शरीराबरोबरच मनालाही ऊर्जा मिळते,आत्मविश्वास दुणावतो. रोज सकाळी कोवळ्या उन्हात शेखरनी आणलेल्या कॉफीचे घोट घेत सभोवार निरखणं आनंददायक होतं.
मी नुकताच ३० जणांना घेऊन Valley Of Flowers चा ट्रेक करून आलो होतो. तिथून येताना जाम सर्दी झाली होती,जी इथपर्यंत अजून तशीच होती. आधीच नाक जाम त्यात अतिऊंचीवर असल्याने श्वास घ्यायला मारामारी करावी लागत होती. आज पण जेवणानंतर आम्ही सगळे युनामच्या पायथ्यापर्यन्त चालून आलो. उद्या आम्हाला आमच्या समिट कँपला जायला एक ओढा ओलांडावा लागणार होता. ओढा क्रॉस करायला त्यातल्या त्यात सोप्पी जागा कोणती हे बघून आम्ही बेस कँपवर परतलो.
झिंग झिंग बारपेक्षाही इथे ऑक्सिजनचं प्रमाण कमी होतं आणि वाराही कोरडा, गार! सगळ्यांच्या हालचालींवर काही प्रमाणात प्रतिबंध आला. श्र्वास घ्यायला कष्ट जाणवायला लागले. हिमालयातला ट्रेक साधारण ज्या उंचीवर संपतो तिथून आमची युनाम मोहीम सुरू झाली.
शरीरामधल्या घड्याळाचं वेळापत्रक आणि हिमालयाच्या घड्याळाचं वेळापत्रक जुळायला लागलं होतं. ५ वाजता जाग, ६ ला चहा, ७ ला breakfast आणि ८ वाजता कॅम्पवरून पुढे असा सकाळचा ६.७.८ चा पॅटर्न सेट झाला. आणि संध्याकाळी ६ वाजता high tea, ७ वाजता जेवण आणि ८ वाजता टेन्ट मधे पसार. जागे कधी पर्यन्त असायचो आणि झोप लागायची कधी हे सगळ्यांना न सुटलेलं कोड होतं. न सुटणारी कोडी तशीच ठेवून आम्ही आपले स्लीपिंग बॅगमध्ये गेलो.
आज सगळ्यांचीच पूर्व परीक्षा होती. आज आम्ही समिट कँपला जाऊन परत येणार होतो. पण सडे न जाता समिटसाठी लागणारं वैयक्तिक सामान घेऊन! म्हणजे आज नेहमीपेक्षा जास्त वजन घेऊन साधारण 17500 फुटांवर जायचं होतं. सकाळी लवकर ब्रेकफास्ट करून सगळे निघालो. लवकर निघाण्याचं कारण म्हणजे सकाळी वातावरण थंड असल्यामुळे डोंगरावरचा बर्फ घट्ट असतो त्यामुळे ओढ्याला पाणी कमी असणार होतं, ओढा क्रॉस करायला सोप्पं जाणार होतं. ओढा क्रॉस करून चढणीला लागलो. चढण जशी सुरू झाली तशी सगळ्यांची छाती भरून आली, श्वास जड झाले आणि चाल मंद झाली. आम्ही जिथून चाललो होतो तेवढ्याच भागात निळी आणि पिवळी फुल फुलली होती. जणू युनामने आमच्या स्वागतासाठी फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. आता छातीवरचा चढ सुरु झाला. सह्याद्रीतील चढ वेगळा आणि हिमालयातला वेगळा, अतिऊंचीमुळे प्रत्येक पाऊल टाकणं कष्टप्रद होतं. सर्दीमुळे मी तर हैराण झालो होतो पण ब्रेक घेणं मला परवडणारं नव्हतं. पुढे चालणाऱ्या climber ला टप्प्यात ठेवून मार्गक्रमण चालू होतं. बरंच चालल्यानंतर समोर खिंड दिसायला लागली. आता समिट कँप टप्प्यात आला असं वाटलं. पण ते वाटणंच होत. हा संपूर्ण रस्ता घसाऱ्याचा होता. ना पक्की जमीन, ना पायवाट. अमित, विजय, शेखर आणि डॉ. नागनाथ छान चालत होते. त्यांचा स्पीड बघून या चौघांचं समिट होणार असा विश्वास वाटला. आता आम्ही सगळे समिट कँपला पोचलो.
समिट कँप वरून युनामचं शिखर स्पष्ट दिसत होतं. आमचा खालचा बेस कॅम्प आणि लेहला जाणारा रस्ताही स्पष्ट दिसत होता. समिट कँपवर बेस कॅम्प सारखे A frame चे टेन्ट नव्हते. इथे डोम शेप टेन्ट होते. सगळ्या कँप साइट वर सुटे दगड पडलेले होते. जिथे जागा मिळेल तिथे टेन्ट लावले होते. कुठेही नैसर्गिक आडोसा नसल्याने या जागेवर भरपूर वारा होता.
सामान टाकून, थोडं खाऊन परत बेस कॅम्पला निघालो. सगळे fit and fine होते. निघायला उशीर झाल्यामुळे ओढ्याचं पाणी वाढलं होतं. सगळ्यांबरोबर ओढा क्रॉस करून जाणं धोक्याचं होतं म्हणून आम्ही longcut मारायचा निर्णय घेतला. मध्येच असलेल्या डोंगराला वळसा मारून तो मार्ग खाली उतरत होता. हा रस्ता तीव्र उताराचा आणि प्रचंड घसाऱ्याचा होता. साधारण दोन तीन वाजेपर्यन्त सगळे बेस कॅम्पला पोचलो. आल्यावर मस्त जेवण करून पत्ते खेळत बसलो. आमच्याबरोबर असलेल्या दुसऱ्या टीमच्या काही participants ला high altitude चा त्रास झाला त्यामुळे ९ जण परत नग्गरला रवाना झाले. आमची वेगवेगळ्या तीन क्लबची एकत्रित 21 जणांची टीम 12 जणांवर आली.
उद्याचं प्लॅनिंग करून निद्राधीन झालो
क्रमशः
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
Write a comment ...