लेखी परीक्षा ३ तासांचीच असते पण आमची परीक्षा आज पासून ते २४ तारखेला सगळे परत सुखरूप बेस कँपला येईपर्यंत चालणार होती.
सकाळी ब्रेकफास्ट करून जास्तीचं सामान म्हणजे आम्हाला लागणारं मीठ- पीठ, स्लीपिंग बॅग, मॅट, बाकी रेशन सगळ्यांनी आपापल्या सॅकमध्ये कोंबलं. कालच्या पेक्षा सॅक जड झाली होती. शेखरचा एक खांदा काही वर्षांपूर्वीच दुखावलेला होता त्यामुळे त्याला फार सामान उचलता येणार नाही हे त्याने आधीच सांगितलेलं होतं. तरीही फुल लोडेड सॅक त्याने सर्व दिवस उचलली.
आज डॉ. नागनाथ आणि विजय सगळ्यांच्या पुढे होते. अमित आणि शेखर त्यांच्या तालात मस्त चालत होते. वेळेत सगळे समिट कँपवर आलो. सर्दीमुळे मी पुरता जाम झालो होतो. सगळ्यांनी थोडी विश्रांती घेऊन hight gain करण्यासाठी साधारण पर्वतीएवढ्या उंचीवर जायचं ठरवलं. खरंतर या साठी जाणं खूप जीवावर आलं होतं, पण नियमाला अपवाद करून चालणार नव्हतं. उंचीवर पोचल्यावर डोंगराच्या पलीकडची बाजू दिसायला लागली.
आज रात्रीच साधारण 12-1 वाजता समिटसाठी निघायचं होतं. संध्याकाळी लवकर जेवण केलं. आणि शरीराला विश्रांती देण्यासाठी सगळे टेन्टमध्ये गजर लावून पडून राहिलो.
मध्यरात्री थोडं खाऊन, अंगावर कपड्यांचे थर चढवून समिटसाठी सगळे निघालो. माझा अवतार बघून अमित म्हणाला 'समिटला नको येऊ, आम्ही काही म्हणणार नाही तुला', पण मोहिमेचा नेता या नात्याने, नैतिक जबाबदारी म्हणून शक्यतोवर स्वतःला खेचत टीम बरोबर जाण्याचा मी निर्णय घेतला. सुरुवातीपासूनच खडी चढण होती. वारा अनिर्बंध वाहत होता. पंचमहाभुतांपैकी एका महाभुताची ताकद सगळे अनुभवत होतो. प्रत्येक पावलाला hight gain होत होती, स्प्रिंट मारल्यावर जसा छातीचा भाता हलतो तसा संथ गतीने चालल्यावर हलत होता. श्वासाची लय तुटायला लागली अन् आपोआपच दोन ग्रुप झाले. पावलांचा आणि श्वासांचा हे दोनच आवाज आसमंतात ऐकू येत होते. थोडं चालल्यावर आम्ही पाच एक मिनिट बसायचो. चालून बसताना आणि परत उठताना प्रचंड एनर्जी जायची, वाऱ्याचा माराही चालूच असायचा. विश्रांती अशी नव्हतीच मिळत. दुसऱ्या टीमचे काही काही जण तर पाच पावलं चालून वॉकिंग स्टिकवर डोकं टेकवून झोपायला लागले. हे फार टेन्शन देणारं होतं. अशा परिस्थितीत त्यांनी पुढे वर जाणं योग्य नाही असं आमच्याबरोबर असलेल्या ग्राउंड क्रूच्या मित्रांनी सुचवलं आणि यावर आम्हाला निर्णय घ्यायला सांगितला.
आम्ही जिथे थांबलो होतो तिथून पुढे सतत ४ तासाची चाल होती. युद्धात जसं चढाईबरोबर योग्य वेळी माघार महत्वाची असते अगदी तसच गिर्यारोहणात पण आपली वेळ ओळखून परत फिरण्याचा निर्णय महत्वाचा असतो. आम्ही ६ जणांनी परत समिट कँपला जाण्याचा निर्णय घेतला. डॉ. नागनाथ आणि विजय समिट साठी पुढे निघाले.
त्या अशक्य थंडीत खाली कँप साइट पर्यन्त उतरणं पण एक दिव्य होतं. तांबडं फुटायच्या थोडं आधी आम्ही सगळे सुखरूप कँप वर पोचलो.
सूर्योदय झाला, आता आमच्या नजरा समिटच्या दिशेला लागल्या होत्या. जोपर्यंत सगळे सुखरूप खाली येत नाहीत तोपर्यंत कोणाच्या जीवात जीव नव्हता. डोंगरावरून येणारे ठिपके जवळ जवळ येत हळू हळू स्पष्ट व्हायला लागले. डॉ. नागनाथ आणि विजयचं समिट झालं. त्यांच्या चेहऱ्यावर अपार कष्टामुळे झालेला त्रास आणि समिट झाल्यामुळे त्या कष्टाचं झालेलं चीज असे मिश्र भाव दिसत होते.
त्यांच्या पाठोपाठ बाकीच्या टीम मधले पण सुखरूप कँप वर आले. ती रात्र आम्ही समिट कँपवरच काढली.
सकाळी लवकर कँप साइट wind-up करून सगळे भरतपूरला आलो. वेळ न घालवता भरतपूरचा कॅम्प आवरून नग्गरला निघलो. नग्गरला आल्यावर मनावरचा ताण गेला. Expedition १००% यशस्वी झाली. आमचं समिट हुकल्याचं अजिबात वैषम्य वाटलं नाही, कारण डॉ. नागनाथ आणि विजयच यश आमचं सांघिक यश होतं. आमचं म्हणजे फक्त ट्रिनिटीच नाही तर आमच्या बरोबर असलेल्या सर्व सपोर्ट स्टाफचं, आमच्या साठी अन्न बनवणाऱ्या आचाऱ्यांचं, मोहिमेचं logistic बघणाऱ्या आमच्या बेस एजन्सीचं.
कोणत्याही खेळाची हीच तर गम्मत आहे. खेळ अपयश पचवायला आणि यश वाटायला शिकवतात.
आज नग्गरच्या सुखावह बेस कॅम्पला झोप लागणं जरा मुश्किल होतं. सप्टेंबरमध्ये प्लॅन केलेल्या केदारनाथ यात्रेच्या विचारात मात्र छान झोप लागली. पुण्यात फक्त भोज्ज्याला शिवायला जायचं मग परत आपली वारी हिमालयात !!
एव्हरेस्ट सामीटर सुरेंद्र जालिहाळ
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
Write a comment ...