श्रावण-भाद्रपदामध्ये सगळा सह्याद्री एखाद्या षोडशी सम लोभस दिसतो. सोनकी, कारवी आणि इतर अनेक रानफुलांनी बहरलेला असतो. नेमकं हेच सौंदर्य त्याचा अभिशाप ठरतं. शनिवार रविवार आले की रील संस्कृतीची विकृत मंडळी सह्याद्रीची शांतता आणि सौंदर्य बाटवत फिरू लागतात. सहृदय डोंगर प्रेमींना मग ह्याच गर्दीत सौंदर्य आणि शांतता शोधावी लागते. अचानक मनात विचार आला की रविवार ऐवजी दुसरा दिवस प्लॅन केला तर... आणि २४ तारखेच्या गुरूवारी रतनगडचा ट्रेक नियोजित केला.
ट्रेक declare केल्याबरोबर ओंकारने पैसे भरून ट्रेक register केला. मुक्ता आणि चिंतामणीनेही लगेचच रुकार दिला. महेंद्र काकांनी तोरणा ट्रेकमध्ये रतनगडला येणार असल्याचं जाहीर केलं. २२ तारखेपर्यंत उणेपुरे चौघ जण निश्चित होतें. जे येणार होते ते कामावर सुट्टी टाकून येणार होते. त्यामुळे तोटा झाला तरी ट्रेक न्यायचाच असं ठरवलं. २३ तारखेला सकाळी आकडा ८ पर्यंत गेला. बसायला अडचण नको म्हणून मोठ्ठी गाडी बुक केली. दुपारी तेरापर्यंत गेलेला आकडा परत आठवर येऊन स्थिरावला. तीन एक्के फक्त चित्रपटात अमिताभ बच्चनच्याच हातात येऊ शकतात! सगळ्यांना आपल्या हातात आलेल्या पानातच डाव खेळायचा असतो. ट्रेकला संख्या कमी असल्याचं मळभ मनात फार काही वेळ टिकलं नाही. निसर्गात संचार असल्यामुळे असेल कदाचित चांगल्या किंवा वाईट गोष्टीत फार काळ मन अडकत नाही. सगळ्यांना घेऊन ११:३० वाजता निघालो.
हायवे सोडून जशी गाडी नारायण गावच्या फाट्याला लागली तशी आमची रोलर कोस्टर राईड सुरू झाली. पुढचा माणूस मागच्या सीटपर्यंत आणि डावीकडचा उजव्या सीटवर इच्छा नसताना बसल्या बसल्या उड्या मारायला लागले. क्षणभर विश्रांती कोणाला मिळाली नाही. साडेतीन चारच्या सुमारास बसमध्ये शेवटची उडी मारली. आम्ही रतनवाडीला पोचलो. अरुणच्या घरी पडी मारून, सहाला नाश्ता करुन साडेसहाला गडावर निघायचं असं नियोजन होतं. प्रदीपकाका वा सुभाषकाका, कोणाची माहित नाही पण चटईवर पाठ टेकल्या टेकल्या ब्रह्मानंदी टाळी लागली, जोरदार घोरणं सुरू झालं. गाडी, घोडा, बंगल्यापेक्षा जमिनीवर पाठ टेकल्यावर ज्याला झोप लागेल तो खरा श्रीमंत माणूस. बाकी सब माया हैं. एकामागून एक सगळे एकमेकांच्या घोरण्यात सामील झाले.
साडेसहाला पहिला गजर झाला. गजर बंद करायचा तर झोपेत बहुतेक स्नूझ दाबलं गेलं असावं. दर पाच मिनिटांनी गजर वाजत होता. आता मोबाईलच्या गजराबरोबर कोंबडा पण कानात येऊन आरवायला लागला. मोबाईलचं नरडं आवळता येईल पण कोंबड्याचं नरडं कसं आवळणार!! आज गुरुवार असल्यामुळे कदाचित कोणी अभक्ष भक्षण पण केलं नसतं. शेवटी सगळे उठलोच. नियोजित वेळेपेक्षा तासभर उशीर झाला. आमचे दिशादर्शक झाडेमामा पण आले. सगळे नाश्ता करून ७:३० वाजता निघालो. कितीही वेळा ट्रेक झालेला असला आणि वाट पायाखालची जरी असली तरी स्थानिक वाटाड्या घ्यायचाच असा आमचा दंडक. गावात रोजगार निर्मितीसाठी आपला हा खारीचा वाटा. ह्या लोकांना रानाची, वाटांची खूप छान माहिती असते. घरापासून दोन अडीच किलोमीटर रस्त्याने चालून ट्रेक सुरु करायचा होता. आमचा ड्रायव्हर त्या रस्त्यावर गाडी परत घालायला तयार नव्हता. त्याची गाडी कोरी करकरीत होती त्यामुळे जपत होता. नव्या नवरीचे नऊ दिवस; बाकी काय! पोह्यांचा शेवटचा घास खाल्ला आणि कृष्णानी वेळेवर आमच्यासाठी जिपाड पाठवलं. त्या दोन किलोमीटरच्या प्रवासात सगळे पोहे पचले.
साडेसातच्या ठोक्याला आमचा ट्रेक सुरु झाला. दोन खडे टप्पे चढल्यावर एका पठारावर आलो. डावीकडे खुटा आणि रतनगड दिसायला लागले. डोळ्याला सुध्दा खूप अंतर दिसत होतं. टोपली कारवी पठारावर, डोंगर उतारावर पसरली होती. दोन वर्षापूर्वीच त्यांना फुलं येऊन गेली होती. पठार संपवून डावीकडे लांबलचक traverse ला लागलो. कारवीच्या बोगद्यातून घुसताना दोन मिनिट निःशब्द झालो. अंगणात पारिजातकाचा जसा सडा पडलेला असायचा तसा ह्या रानवाटेवर कारवीचा सडा होता. पाऊल ठेवायला पण जागा नव्हती. सगळंच रान कारवीने बहरलं होतं. जागोजागी रतनगडाने आमच्यासाठी कारवीच्या फुलांच्या पायघड्या घातल्या होत्या. जणू काही आम्ही उत्सवमूर्तीच होतो.
उजवी कडे कड्यातून पाणी वहात होत. घरून आणलेलं क्लोरीनयुक्त पाणी ओतून देऊन ते स्वच्छ आणि गार पाणी भरून घेतलं. मुख्य पायवाट सोडून उजवीकडे चढणारी वाट पकडली. आमच्यामागून एक काका आणि एक मुलगा डोक्यावर पाण्याच्या बाटल्या घेऊन झपाझप चालत पुढे गेले. दाट झाडीतून वर आलो, खुटा सुळक्याच्या खालून थोडं चढून वर आलो तर वरती ते काका आणि मुलगा छोटं दुकान थाटून आमचीच वाट बघत बसले होते. सरबत पिऊन पुढे निघालो. रतनगडाच्या खाली एका खिंडीत आलो. एक वाट साम्रद गावामध्ये उतरत होती. रतनगड डावीकडे ठेवून traverse ला लागलो. रतनगडाचा काळाकभिन्न कातळकडा मोहवत होता. कधीकाळी थोडंफार rock climbing केलं असल्यामुळे असेल, पहिलं प्रेम "दगड" आहे. कृष्णाचा हात मोरपीस होऊन जसा राधेच्या गालावरून फिरत असेल तसा माझा हात त्या दगडावरून आपसूकच फिरला!
लांबलचक आणि आडदांड पायऱ्या चढून बलदंड दरवाज्यातून आम्ही गडात प्रवेश केला. आता कुठे आम्ही खुट्याच्या समांतर पातळीला आलो. तडक नेढं जवळ केलं. नेढ्याच्या सावलीत सगळे इतस्ततः विखुरलो. अनाहत ध्वनीसारखा वाऱ्याचा आवाज कान आणि मन तृप्त करत होता. कितीतरी वेळ सगळे निर्विचार आणि निर्विकार झालो होतो. आज गड त्याच्या खऱ्या रूपात दिसत होता. ना बीभत्स आवाज, ना हौशी रीलवाल्या लोकांची गर्दी. ती शांतता आणि सौंदर्य अनुभवायला तर सगळे कामावर सुट्टी घेऊन गुरूवारी आलो होतो. तिथून उठण्याची कोणालाच इच्छा नव्हती.
चिंतामणीने हाळी दिली. "लवकर चला, जेवायला वेळेत पोचायचं आहे". हे वाक्य आमच्या ट्रेकचं ब्रीदवाक्यं झालं होतं. जेवायच्या वेळेपर्यंत गावात पोचणं केवळ अशक्य होतं. घरून कोणी काय काय आणलेल्या पदार्थांवर थोडी क्षुधाशांती केली आणि गडाचा फेरफटका मारायला उठलो. कळसूबाई, अलंग, मदन, कुलंग, हरिश्चंद्रगड, भैरवगड, कात्राबाई, आजोबाची भिंत, सांदण दरी, बाणचा सुळका हे सगळं सह्याद्रीचं वैभव दृष्टीसमोर होतं. टाकी ओलांडून छोटेखानी झाडीत दडलेला कल्याण दरवाजा पाहिला. पुढे कडेलोटपर्यंत गेलो. तिथून दिसणारा कात्राकडा म्हणजे सह्याद्रीच रौद्र सौंदर्यच. सळसळत्या रक्ताला सह्याद्री खुणावतो तर विरागी मनाला हिमालय बोलावतो. दोन्ही पर्वतराजींचा बाज वेगळा!
घड्याळाचा काटा जेवढा भराभर पुढे पळत होता तेवढेच आम्ही निवांत होतो. गणेश दरवाज्याने खाली उतरायला सुरुवात केली. गणेश दरवाजा छोटासाच आणि आकर्षक शिल्पांनी सजलेला! या दरवाज्यापाशीच एक वाजला. पोटात भुकेचा आगडोंब उसळला. आता मात्र सगळे झपाझप पावलं उचलत गड उतार झालो. पक्ष्यांचे, वाऱ्याचे अन् झऱ्यांचे आवाज कानात साठवत आणि बेलाग रतनगड, गर्द झाडी, कारवी, सोनकीच्या फुलांचे रंग मनात कोरत रस्त्यापाशी आलो. सुग्रास आणि गरमागरम भोजनाने शांती झाली. तिथूनच शतपावली करत एक भग्न मंदिराचे अवशेष बघितले. परतताना अमृतेश्वर मंदीर पाहायला गेलो.
प्रत्येक जीवात शिव विराजमान असल्याची प्रचिती आपल्याकडची पुरातन मंदिर पाहताना येते. चित्रकार ज्या सफाईने कॅनव्हासवर त्याचा कुंचला फिरवतो त्याच सफाईने शिल्पकारांनी दगड घडवून मंदिराची निर्मिती केली आहे. मुक्ताचा मंदिरशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे ती खूप छान माहिती सांगत होती. मंदिर नुसतंच बघणं वेगळं आणि माहिती घेऊन बघणं वेगळं. ओमकारलाही या विषयाचीआवड असल्याने चर्चा रंगल्या होत्या.
सूर्यनारायण मावळतीच्या दिशेला सरकत होता. जाता जाता भंडारदऱ्याच्या पाण्यात त्याचा थोडा रंग मिसळला. तत्क्षणी मनात गाण्याची ओळ उमटली, "जेथे मिळे धरेला आभाळ वाकलेले अस्ताजलात जेथे रविबिंब टेकलेले, जेथे खुळ्या ढगांनी रंगीन साज ल्यावा..." मनात आलं आपलं मराठी साहित्य भाव भावनांनी किती समृद्ध आहे. हे पुढच्या पिढीत रुजवायला हवं.
आज दिवसभरात १४ किलोमीटरची पदयात्रा झाली. मनात शांतता आणि शरीरात हवीहवी वाटणाऱ्या वेदनेचे प्रवाह होते. बऱ्याच दिवसांनी शरीर आणि मनाला सुखावणारा ट्रेक झाला. आजचा दिवसही श्रीकृष्णार्पण!!
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
Write a comment ...