परंपरा. म्हणजे आजच्या बोलीभाषेत rituals!! तर या rituals ला फार महत्त्व आहे. दिवाळीत उटण्याएवढाच मोती साबणाला मान, मोती साबण अंगाला लागल्या शिवाय दिवाळी साजरी होऊच शकत नाही. अगदी तसंच अमेरिकेवरून अभिषेक सुट्टीसाठी आला की आमची हरिश्चंद्रगडावर वारी झालीच पाहिजे, ही आमची एक परंपरा. त्याशिवाय त्याची भारत यात्रा सुफळ होत नाही.
लहानपणी जसं ज्या कुणावर राज्य ढकलायचं असायचं त्याप्रमाणे सोईस्कर 10,20,30,40 ची आखणी करायचो, त्याप्रमाणेच 10,20,30 करुन इतर गड किल्ल्यांना बगल देऊन हरिश्चंद्रगडावर जायचं निश्चित केलं. दर वर्षी आम्ही असंच करतो!
बुधवार रात्री अभिषेकच्या नव्या Nexon मधून निघालो. बोटाच्या अलीकडे चहा मारायला थांबलो. खऱ्या जोड्या फक्त वहाणांच्याच असतात असं काही नाही. चहा आणि वेळेची पण अगदी अशीच जोडी आहे. कोणत्याही वेळेला चहा चालतो आणि चहाला पण कोणतीही वेळ चालते! अगदी एकमेकांना पूरक. मस्त गरमागरम वाफाळलेला चहा घेऊन ब्राह्मणवाड्याच्या रस्त्याला लागलो. मी गाडी चालवत होतो. घड्याळात बाराचा ठोका पडून गेला होता. गाडीमध्ये youtube वर सौम्य आवाजात "मनाचे श्लोक" चालले होते. वातावरण अंतर्बाह्य शांत झालं होतं.
गाडीपुढे अचानक डावीकडच्या झुडपातून कुत्र्यापेक्षा लहान चणीचा लांडगा बाहेर आला. गाडीच्या प्रकाशात पुढे पुढे पळत राहिला. अचानक उजवीकडच्या रानात गायब झाला. परत बाहेर आला आणि आमच्या कारपुढे पळत राहिला. परत झाडीत लुप्त झाला. त्याने असं दोनदा आम्हाला दर्शन दिलं. ट्रेकच्या सुरवातीलाच एका हिंस्त्र प्राण्याचं दर्शन हा आम्हाला शुभशकुनच वाटला. ह्या भागात बिबट्यांचा सुळसुळाट फार. कुठल्या तरी वळणावर, झाडी झुडपात, झाडावर बिबट्या दिसेल ही आशा मनात ठेवून पुढे निघालो. रस्त्यावर फक्त आमचीच गाडी चालली होती. नुकत्याच दिसलेल्या लांडग्यामुळे आम्ही जाम एक्साइट झालो होतो. ब्राम्हणवाडा क्रॉस केला. साधारण दीड दोनच्या सुमारास एका गावातून जाताना आमच्या पुढ्यात एक पट्टेरी तरस आलं. नुकतीच शिकार करून तोंडात सावज पकडून चाललं होतं. छोटा मांसाचा गोळा तोंडात होता. दोन कुत्र्यांना एका वेळेला सहज लोळवेल एवढ्या आकाराचं धूड होतं ते! तरस रस्ता सोडून एका मोकळ्या जागेत शिरलं तशी आम्ही गाडी त्याच्या मागे टाकली. मातीच्या ढिगाऱ्यामागे बसून ते शिकार खात होतं. खाली उतरून जरा पुढे जाऊन बघण्याची कल्पना आली. आम्हाला बघून त्याच्या तोंडाला पाणी सुटल तर? होती ती शिकार सोडून त्याने आमचीच शिकार केली असती. उगा त्याच्या चवीत बिघाड व्हायला नको म्हणून आम्ही खाली उतरण्याचा बेत रद्द केला. चौकात शेकोटी करून शेकत बसलेल्या पोलिसांना घडला प्रकार सांगितला तर म्हणाले, "रोज चक्कर असते तरसाची. बिबट्या पण अधून मधून येतो. तुम्हाला पण दिसू शकेल कदाचित." आता आमची आशा अजूनच पल्लवित झाली. चौफेर लक्ष आणि फोन सज्ज ठेवून आम्ही मार्गक्रमण सुरू केलं.
साडेतीनला पाचनईत पोचलो. बिबट्या पाहायचा शेवटचा चान्स घ्यावा म्हणून गावात न थांबता गावाच्या पुढे असलेल्या पाप-पुण्य तलावाशेजारी गाडी थांबवली. आता चांदोमामा डोक्यावर आला होता. चंद्राने त्याच्या शीतल प्रकाशाची पांढरी चादर सभोवार अंथरली होती. डावीकडे किर्र दाट जंगल, उजवीकडे गवताळ पट्टा आणि त्यापलीकडे परत जंगल, मधून जाणारा रस्ता, त्यावर छोटा पूल आणि पुलावर बिबट्याच्या प्रतीक्षेत गाडीत बसलेलो आम्ही. भरपूर पाऊस झाल्याने जंगलात जागोजागी पाणवठे तयार झाले आहेत. त्यामुळे पाण्यासाठी बिबट्या याच तलावापाशी येण्याची शक्यता 0.01% च होती. पण तरी एका वेड्या आशेपोटी आम्ही गाडीचा अँगल सेट करून बसलो होतो.
दोन मिनिटात आम्ही निद्रेच्या अधीन झालो. एकदम ढाराढूर पंढरपूर! बिबट्या जरी सहकुटुंब सहपरिवार तळ्यावर येऊन गेला असला तरी आम्हाला कळण्याची सुतराम शक्यता नव्हती. सूर्यनारायण क्षितिजापासून दोन हात वर आला. रात्री चांदीचा वर्ख लावल्याप्रमाणे दिसणारी सृष्टी सकाळी सोन्याचं पाणी दिल्यासारखी झळाळत होती.


प्रकाशकडे चुलीवरचे पोहे खाऊन त्रिंबक मामांना घेऊन ट्रेक सुरू केला. निघायला चांगलाच उशीर झाला होता. ह्यावेळेला "वेताळ दाराने" गड चढायचा होता. पाचनई गावातून आमची रपेट निघाली. साधारण पंधरा मिनिटं टार रोडवरून चालल्यावर उजवीकडच्या डोंगरात घुसलो. उन्हाचे कोवळेपण संपून तडाखे बसायला लागले. वाट अखंड चढत होती. पावसाळ्यातलं हिरवं लुसलुशीत गवत भाल्याच्या फाळासारखं अणकुचीदार झालं होतं. ह्या वाटेवर राबता नसल्याने वाट काढत जावं लागत होतं. तीव्र चढ आणि छोट्या छोट्या कातळटप्प्यावरून चढाई सुरु होती. चालायला सुरुवात केल्यापासून सीतेचा डोंगर, नाफ्ता, कलाडगड, कोंबड्याचा डोंगर, शिरपुंज्याचा भैरवगड, घनचक्कर वेगवेगळ्या कोनातून दिसत होते. धारेवरून वर चढल्यावर कुंजिरगड पण दिसायला लागला होता. सोंडेवर चढून अजस्त्र हरिश्चंद्रगडाच्या शेवटच्या बिंदूपर्यन्त आलो. आता चढाई संपून सरळसोट चाल होती.


भाजी भाकरी खाऊन केदारेश्वर आणि हरिश्चंद्राचं दर्शन घेऊन कोकणकड्यावर आलो. शनिवार रविवार सोडून आल्यामुळे कड्यावर आमच्या व्यतिरिक्त कोणीच नव्हतं. गड आणि कडा मोकळा श्वास घेत होते. मनसोक्त कड्यावरून दरी न्याहाळली. स्टोव्हवर फर्मास चहा ठेवला. थंड वारा, अस्तंगत जाणारा सूर्यगोल, हवीहवीशी वाटणारी निःशब्द शांतता आणि हातात वाफाळणारा चहा! आनंदी होण्यासाठी आम्हाला इतक्या गोष्टी पुरेश्या होत्या.





सूर्य क्षितिजाआड गेला होता. मनात रेंगाळणाऱ्या गतकाळातल्या सुखद स्मृतींसारखा संधीप्रकाश मागे रेंगाळत होता. पण काही क्षणातच तो अंधाराच्या गर्भात लुप्त झाला. आता पूर्ण अंधारात आम्ही वीस एक मिनिटं चालत पाटील काकांच्या घरी आलो. शेकोटीत काड्यांची आहुती पडत होती. त्यामुळे आमच्याभोवती उबदार कडं झालं होतं.

आजकाल गडाचं गडपण गर्दीत आणि शांतता गोंगाटात हरवली आहे. आत्ताच मागे एका गुरूवारी रतनगड केला होता. ओंकार आणि प्रज्ञा ऑफीसला सुट्टी टाकून आले होते. कारवीचे गालिचे घालून रतनगडाने एक अविस्मणीय अनुभव दिला होता. अधूनमधून असे शनिवार रविवार सोडून ट्रेक केले पाहिजे.
वर आकाशात असंख्य तारे पृथ्वीवरच्या दिव्यांना वाकुल्या दाखवत होते. आकाशाकडे पाहिलं की कायम मनात येतं की आपण भूतकाळात पाहतो आहे. कितीतरी लाखो वर्षांपूर्वी मेलेल्या ताऱ्याचा प्रकाश आपण आत्ता पाहतो आणि तो तारा तिथे आहे असं समजून चालतो. तसा माणसाचा सगळा रस भूत आणि भविष्यातच! पण निसर्गात आल्यावर पानं-फुलं, डोंगर-दऱ्या, नक्षत्र-तारे, पक्षी, फुलपाखरं, स्वच्छंद झऱ्यांकडे बघून मनातून भूत आणि भविष्य आपोआप गळून पडतं आणि साक्षात्कारी वर्तमानाची अनुभूती येते. त्यासाठी डोंगर भटकंती हवीच!
चुलीवर भाकरीचा चर्र.. आवाज यायला लागला तसा पोटात भुकेचा ज्वर वाढायला लागला. आकंठ जेवण झाल्यानंतर पोट नको म्हणत होतं पण जीभ हवं म्हणत होती. मग काय, मारला आडवा हात!
सकाळी गड पायउतार झालो. तडक गाडी काढून "हपट्याच्या कड्यावर" गेलो. इथून सादडे घाट आणि सीतेच्या डोंगराचे कडे खूप रौद्र दिसतात. नेहमीच्या रस्त्याने न जाता शिरपुंज्यावरुन गाडी काढली. डोंगरांमधून, छोट्या गावातून आणि गर्द झाडीतून जाणारा नागमोडी रस्ता. वाहतूक कमी त्यामुळे ड्रायव्हिंगचा मनमुराद आनंद घेतला.


डोंगर-दऱ्यांच्या पंचक्रोशीतून जसे बाहेर आलो, तसे कानात हॉर्नचे आवाज यायला लागले. असो. सुख-दुःख, दिवस-रात्र, ऊन-सावली हातात हात घालूनच फिरत असतात.
दोन दिवस डोंगरात अनुभवलेलं सुख आणि शांतता शहरी बजबजपुरीला काही दिवस तरी पुरून उरणार होती.
आणि .... शांततेचा रिचार्ज संपत आला की आहेच परत डोंगराची वाट!
|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||
Write a comment ...