हम कहीं जाते नहीं, हमें वहॉं ले जाया जाता है|

नुकताच देवतिब्बा ट्रेकला जाऊन आलो होतो. Valley of flowers चा ट्रेक लावायचा का नाही अशी चर्चा चालली होती. पण finally तो announce केला.

दोन श्वासांमधलं अंतर जेवढं असतं तेवढीच उसंत 'देवतिब्बा' आणि 'व्हॅली ऑफ फ्लॉवर' ट्रेक मध्ये होती.

तसा मनात कायमच हिमालय रुंजी घालत असतो परंतु इतक्या लवकर देवभूमीतून आवतन येईल असं स्वप्नी पण वाटलं नव्हतं. ट्रेकला response कमी आला तर नुकसान ठरलेलं होतं. पण म्हणतात ना "इश्क है तो रिस्क है". ट्रेक लॉन्च केल्यापासून ते ट्रेक संपवून परत हरिद्वारला पोचेपर्यंत निरंतर अनिश्चितता अनुभवली. आता ह्याला 'रिस्क' म्हणायचं की 'इश्क' हे प्रत्येकावर अवलंबून आहे.

ज्याच्यावर निस्सीम प्रेम असतं त्यात देवत्व दिसायला लागलं की समजावं प्रेम परिपक्व झालं. त्या नगाधिराज हिमालयाबरोबर पण असंच नातं फुललं. रिस्क कधी जाणवली नाही पण इश्क मात्र प्रत्येक श्वासागणिक जाणवतं. कारण हिमालयाच्या वेशीतून बाहेर आलं तरी चिंतनात अहर्निश तोच असतो.

ट्रेकला निघण्यापूर्वी काही दिवस आधी प्राजक्तानी एक बातमी टाकली, "उत्तराखंडात पावसाचा हाहा:कार". म्हटलं दुर्लक्ष कर, आपण जाईपर्यंत होईल सगळं सुरळीत. हिमालयाच्या दिशेनी पाऊल पुढे पडलं की मागे घेणं नाही. जो होगा वो देखा जाएगा. जाऊन तर बघू. ज्यावर प्रेम असतं त्याची एक झलक, काही क्षणांचा सहवास पण खूप काही देऊन जातो. सगळी धडपड त्या मोजक्या क्षणांसाठी.

ट्रेक घोषित केल्याबरोबर चिंतामणी खाडे काका-काकूंनी लगेच रुमाल टाकला. बऱ्याच दिवसांनी K3 म्हणजे तीन कुलकर्णी. प्राजक्ता, जगदीश आणि चिरंजीव आर्यन यांनी सीट बुक केली. तोपर्यंत खाडेकाका संभ्रमात होते की ट्रेक जाणार की नाही. कारण तोपर्यंत फोना-फोनी करुन त्या दोघांचं विमान आरक्षित झालेलं होतं. म्हटलं काळजी नसावी, कोणी आलं नाही तर आपण तिघे जाऊ पण ट्रेक जाणारच. शलाका काही दिवस आधी आमच्या चमूत आली. अशा सात जणांचा आमचा छोटा गट बनला.

सगळे रामप्रहरी विमानतळावर पोचलो. ट्रेक आधी प्रत्यक्ष भेट नाही की औपचारिक झूम कॉल नाही. सगळे सगळयांना अपरिचित. विमानतळावर ओळखी झाल्या. दिल्लीला पोचल्यावर मित्राच्या भावानी आमच्यासाठी आरक्षित केलेल्या दिल्लीच्या हवामान खात्याच्या guestroom ला आलो. संध्याकाळी वंदे भारत ट्रेन होती. तोपर्यंतचा दिवस हातात होता. जिवाची दिल्ली करायला रणरणत्या उन्हात बाहेर पडलो. इंडिया गेट, नेताजी सुभाषचंद्र बोसांच्या पुतळ्याचं दर्शन घेऊन मागे असलेले 'राष्ट्रीय युद्ध स्मारक' पाहायला गेलो. प्रत्येक भारतीयाचा ऊर अभिमान आणि देशप्रेमानी भरून येईल अशी ही स्मारकं. कारगिल युध्दात सूर्यमंडळ भेदून गेलेल्या हुतात्मा सैनिकांची नावं तिथे अंकित केली आहेत. ती नावं बघताना 'विजेता' पिक्चर मधला शफी इनामदार च्या तोंडचा एक डायलॉग आठवला. ''अंगssद, मरना तो एक दिन सभी को पडता है, लेकिन बात ये है की जिंदगी के किसी कोने में हमने अपनी छाप छोडी है, या नहीं? अगर छाप छोडी है तो मरकर भी जिंदगी से जुडे ही तो रहते है हम." किती सार्थ वाक्य आणि देशासाठी पत्करलेलं सार्थ मरण.

पोटात भुकेचा आगडोंब उसळला तसं चिन्मयनी सांगितलेल्या आंध्र भवनच्या खानावळीत गेलो. पोट शांत झालं आणि आत्मा तृप्त झाला.

6:30 ची वंदे भारत पकडण्यासाठी वेळेत मौसम विभाग मधून बाहेर पडलो. वंदे भारतमधला अनुभव कमाल होता. स्वच्छ, सुंदर, ऐसपैस गाडी. खाली चहा मारायला उतरलो तर गाडीनी हॉर्न वाजवला. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांची धावपळ चालू होती. सामोश्यांचा वास गाडीभर दरवळत होता. तुडुंब पोट भरलेलं असताना सुद्धा वासानी जीभ चाळवली. संध्याकाळचा अल्पोपहार संपेपर्यंत रात्रीचं जेवण आलं. दिल्लीत आल्यापासून नुसता पोटोबा चालू होता. आता विठोबाच्या म्हणजे हिमालयाच्या दर्शनाची ओढ लागली होती.

दिल्लीच्या विस्तृत पठारी प्रदेशाची वेस ओलांडून रात्री हरिद्वारच्या पंचक्रोशीत आलो. रेल्वे स्टेशनच्या समोरच एका हॉटेल मधे मुक्काम केला. सकाळी लवकरच जोशीमठच्या दिशेनी प्रवास सुरू झाला. लोखंड जसं चुंबकाच्या दिशेला खेचलं जातं तसं आम्ही हिमालयाकडे खेचले जात होतो. बोलता न येणाऱ्या बाळाला आई दिसल्यावर जसा आनंद होतो आणि तिच्या कुशीत शिरायला ते जसं आसुसलेले असतं तसं हिमालयाच्या ओढीनी मनाचं झालं होतं.

ऋषिकेशला पोचतो न पोचतो तोच आकाशानी आमचं गडगडाटी स्वागत केलं. पावसाच्या थेंबांवरून तो लवकर आटोपतं घेईल असं काही वाटत नव्हतं. ऋषिकेशला नाश्ता करून गाडीत बसलो. ऋषिकेशपासूनच जाम लागला

Traffic jam

(traffic jam). त्यामुळे गाडी गजगतीनी चालली होती. पुतीन वा मोदींच्याच मागेपुढे गाड्यांचा ताफा असतो असं काही नाही, त्यांच्यापेक्षा जास्त गाड्या आज आमच्या मागेपुढे होत्या. आज आम्ही VVVIP झालो. ट्रॅफिक काही सुटत नव्हतं, पण त्याकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्यावर मनाला तरी बरं वाटलं. वेळ बंद मुठीतून सुटणाऱ्या समुद्राच्या रेतीसारखा निघून चालला होता. पावसाने जरा श्वास घेतला तसं आम्ही हुश्श केलं. पाय मोकळे करायला सगळे बाहेर आलो. समोर पार आभाळात गेलेल्या डोंगरांची रांग दिसत होती. त्यावरच हिरव्याकच्च झाडांचं आच्छादन. झाडीतून वाट काढणारे असंख्य प्रपात घरंगळत खाली नदीत लुप्त होत होते. कटू गोड आठवणींच्या स्मृती जशा मनात अडकून बसलेल्या असतात तसे ढगांचे पुंजके डोंगरात अडकले होते. एरवी डोंगरांच्या पावलातून वाहणारी नदी आज त्याच्या गुडघ्यांवरून वाहत होती. गाड्या मुंगीच्या पावलांनी पुढे सरकायला लागल्या. तो सगळा कारवा पाहून वैमानिकाला डोंगरावरून अजगर सरपटत चालल्यासारखा वाटला असेल.

आमची गाडी देवप्रयागला आली. सतोपंथमधून उगम पावणारी अलकनंदा आणि गोमुखमधून उगम पावणारी भागिरथी देवप्रयागला सहचारिणी होऊन पुढे गंगा हे पवित्र नाव धारण करतात. दोघींच्या पाण्याचा रंग वेगळा. जणू दोन स्वतंत्र व्यक्तिरेखा. संगमानंतरही काही अंतर त्यांचं स्वतंत्र अस्तित्व अधोरेखित करता येतं. गंगा झाल्यावर मात्र कोणतं पाणी कोणाचं हे सांगणं अशक्य. 'स्व' विसर्जित केल्याने भागिरथी आणि अलकनंदेची गंगा झाली, गंगेनी सागरात 'स्व' चं विसर्जन केल्यावर तिचा विशाल सागर झाला, रामाचा श्रीराम आणि कृष्णाचा श्रीकृष्ण झाला. निसर्ग आईच्या मायेने शिकवत असतो पण आपली जन्मापासून मरेपर्यंत सगळी धडपड 'स्व' चं अस्तित्व अधोरेखित करण्यासाठीच. जन्म मरणाच्या चक्रव्यूहात हा 'स्व' मेख होऊन बसलाय.

पंचप्रयागांपैकी देवप्रयाग, रुद्रप्रयाग, कर्णप्रयाग, नंदप्रयाग ओलांडत भीमतलला आलो. इथे पोचेपर्यंत पावसानी आम्हाला झोडपून काढलं आणि अंधारानी पुरतं वेढलं. वाटेत क्वचितच कोणती गाडी पास होत होती. जोशीमठपर्यन्त जाणं पण अशक्य होतं. भीमतलला थांबण्याचा निर्णय घेतला. आमच्या लॉजसमोरच्या रस्त्यावर मोठ्ठा तलाव तयार झाला होता. शलाका आणि प्राजक्ताला त्यातून पाणी उडवत चालण्याची हौस आली. पण टपावरून सॅक उतरवायच्या नादात ते राहून गेलं. प्रवास कुठला का असेना सोबती छान असतील तर वाटेतल्या अडथळ्यांची पण मज्जा घेता येते. आम्ही आमच्या वेळापत्रकाच्या एक दिवस मागे पडलो. "पावसाचा हाहाःकार सुरू झाला होता."

दिवसभर गाडीच्या प्रवासानी पार वाकडे झालो होतो, तरी शलाकानी सगळयांना गाणी म्हणायला उद्युक्त केलं. मग काय जमली मैफिल! चिंतामणीकाका हौशी गायक! स्वतःचा व्यवसाय सांभाळून आनंदासाठी गाण्याचे कार्यक्रम करणारे. मधुर गळ्याचे. हिंदीबरोबरच बंगाली गाणी पण सहज गाणारे. जगदीश मधूनच ठेवणीतली गाणी म्हणायचा, त्याचा पण आवाज कमावलेला. प्राजक्ता म्हणजे स्वतःच्या गाण्याचा मनापासून आनंद घेणारी आनंदी व्यक्ती. शलाकाही सुरेल, हसरी आणि सगळयांना मनापासून दाद देणारी, तर काकू शांत, गाण्यातल्या दर्दी आणि काकांच्या तालमीत तयार झालेल्या. मी आपला नेहमीसारखा गाळलेल्या जागा भरायला तत्पर. प्रवास सुंदर, मैफिल सुंदर पण पाऊस थांबायची कृपा करण्याचं काही नाव नाही. आज आम्ही गोविंदघाटला पोचणं अपेक्षित होतं, atleast जोशीमठला तरी.

आमच्या हॉटेल पासुन काही शे मिटर वर झालेली land slide

सकाळी लवकर निघण्याचा मानस होता पण पावसाचा जोर काही कमी होत नव्हता. 24*7 मोबाईल वर असणाऱ्या आमच्या ड्रायव्हरनी खबर आणली की पुढे 7 ठिकाणी रस्ता खचला आहे एका ठिकाणी तर वाहून गेलाय. आमच्या हॉटेल पासून 500 मीटर वर land slide झाली होती. सगळे जाऊन बघून आलो. आज दुपारी तरी निघता येईल या आशेवर आम्ही गाणी म्हणत पत्ते कुटत बसलो होतो. मागचा डोंगर बघून पाय सळसळायला लगले. एका धबधब्याचा वेध घेत पायवाट जवळ केली. प्राजक्ता आणि खाडे काका काकू काही अंतर चालून खाली निघाले आणि आम्ही वर. छातीवरचा चढ, दाट झाडी, कुंद वातावरण, हवेतला गारवा, मधूनच येणारा धबधब्याचा घनगंभीर आवाज हे सगळं मनाला पल्याडच्या विश्वात न्यायला पुरेसं होतं. खूप कमी वेळात खूप उंची गाठली. पावसाचे टपोरे थेंब पडायला लागले तसे आम्ही उतरायला सुरवात केली. बऱ्याच ठिकाणी रस्ता खचल्यामुळे हॉटेलला अन्न पुरवठा होत नव्हता, त्यामुळे काय हवंय पेक्षा जे उपलब्ध आहे ते खायला लागत होतं पण अशा परिस्थितीत खायला मिळत होतं हेच खूप होतं.

भिमतला मधिल धबधबा

ट्रेकिंग आयुष्याचा भाग झाला की हवं नको पण कमी होतं, जे मिळेल त्यात आनंद वाटतो. रात्री जेवणानंतर खलबतं सुरु झाली. ड्रायव्हरनी land slide चे भीषण फोटो दाखवले. दिवस निसटून चाललेले, रस्ता सुरळीत व्हायला अजून तीन चार दिवस लागणार होते. व्हॅली मध्ये जाताच येणार नव्हत. देवळात दर्शनासाठी असलेली रांग पाहून कितीदा कळसाला नमस्कार केला आहे. देव समजूतदार आहे, समजून घेतो. पण डोंगरांच्या सानिध्यात येऊन तो लांबून पाहूनच परत फिरायच, त्यात न फिरता, न अनुभवता. हृदय तितकं समजूतदार नाही. कसं असणार ते अडकलंयना डोंगरांमध्ये. रात्री सगळ्यांबरोबर खलबतं करून चोपटाला जाऊन तुंगनाथला जायचं ठरलं. कारण हरिद्वारचा रस्ता पण खचला होता. आमचं sandwhich झालं होतं. काय ठरवलं होतं आणि काय चाललं होतं. सगळयांना व्हॅली मधली फुलं बघण्याची आणि हेमकुंड साहिबच्या दर्शनाची आस होती. प्रांजळ मनानी व्यक्त केलेली इच्छा पूर्ण होतेच होते पण त्याची वेळ मात्र इच्छा पूर्ण करणारी ती शक्ती ठरवत असते. परत कधीतरी व्हॅलीचं बोलावणं नक्की येईल. तोपर्यंत प्रतिक्षा.

तुंगनाथ, जगातलं सगळ्यात उंचीवरचं महादेवाचं देऊळ. बहुतेक कृष्णाची इच्छा होती की त्याच्या आराध्याचं दर्शन आम्हाला घडावं म्हणून प्लॅनिंगमध्ये त्यानी थोडासा बदल केला. अच्छा है. त्याच्यावर भार टाकून मस्त पडी मारली.

कधी कधी फसलेले प्लॅनसुद्धा खूप आनंद देऊन जातात. मनाची पाटी कोरी ठेवली की प्रत्येक अनुभव फक्त आनंदच देतात

भीमतल ते चोपटापर्यंतचा प्रवास स्वर्गवत् होता. ऐन थंडीत आज्जीच्या मऊ मऊ नऊवारी साडीच्या ऊबेत लोळत पडावं तसे समोरचे डोंगर अजून दाट धुक्याच्या मायेत लोळत पडले होते. पूर्ण प्रवासात रस्त्यावर फक्त आमचीच गाडी होती. त्या धुक्यानी रस्ता पण झाकोळून टाकला होता. रस्त्याच्या दुतर्फा इतकी दाट झाडी होती की सगळा रस्ता हिरव्या रंगाने प्रकाशमान झाल्यासारखा वाटत होता. पक्ष्यांची भूपाळी चालू होती. हिमालयातल्या थंड वाऱ्यांनी आंघोळीविना शरीर आणि मन ताजंतवानं केलं. डोंगरावरून वाहत येणारा धबधबा रस्ता क्रॉस करुन डावीकडच्या दरीत परत स्वतःला झोकून देत होता. ७० ते ८० अंशाच्या कोनात डोंगर कापून केलेला रस्ता. उजवीकडे उंच डोंगर आणि डावीकडे खोल दरी. खिडकीतून खाली पाहिलं की नजर थेट डोंगराच्या पायाशी पोचायची. वातावरणातील शांतता गाडीत आणि सगळयांच्या मनात उतरली. सगळंच इतकं सुंदर होतं की शब्दांच्या वायफळ बडबडीने त्याला गालबोटच लागलं असतं.

आज स्वातंत्र्य दिन होता. सकाळच्या थंडीत, मस्त नीटनेटकं आवरुन, शाळेचा गणवेश घालून सफरचंदासारखे गाल असलेली पहाडी चिल्लीपिल्ली देशभक्तीपर गाणी आवेशात म्हणत चालली होती. चोपटाला पोचलो आणि नाष्टा करून 10:30 ला तुंगनाथ चढायला सुरवात केली. पहिल्यापासून शेवटपर्यंत घडीव रस्ता. चुकायला दुसरी वाट नाही. त्यामुळे सगळेजण आपापल्या लयीत चालत होते. वेळ कमी होता म्हणून काका-काकू अर्ध्यातून परतले व आम्ही पुढे निघलो. सगळा आसमंत धुक्यानी व्यापला होता. सुर्व्याचं अजून दर्शन झालं नव्हतं. दाट धुक्याने त्याच्या किरणांना कुंपण घातलं होतं. मधूनच पावसाची सर यायची,पण पोंचो घाले घालेपर्यन्त पसार व्हायची. आर्यन पाठीवर स्वतःची आणि पोटावर प्राजक्ताची सॅक घेऊन सगळयांच्या पुढे चालत होता.

एकच्या आसपास मंदिरापाशी आलो. १२,००० फुटावर शंकर महाराज इथे ध्यानस्थ बसले आहेत. देऊळ बघून आनंद झाला आणि दर्शन घेऊन मन शांत झालं. शंकराला जलाभिषेक केला. तिथे आलेल्यांना सर्वांना एकत्र केले आणि राष्ट्रगीत म्हणून स्वातंत्र्यदिन साजरा केला.

१५ ऑगस्ट च्या दिवशी, तुंगनाथ मंदिरात.

शलाकाच्या sub concious मध्ये तुंगनाथ कधीतरी करायचं होतं, ह्या निमित्तानी तिची इच्छा पूर्ण झाली.

खाली उतरून जेवण करून पुढे "सारी" या गावी आलो. हिमालयातलं हे एक सुंदर गाव. "देवरिया ताल" ट्रेकचा बेस कॅम्प. दुसर्‍या दिवशी सकाळी देवरीया तालला जायचं ठरवलं. आमचं इथलं हॉटेल कमाल होतं. मागे देवरिया तालचा डोंगर, दरीच्या टोकावर वसलेलं समोरचं पिटुकलं सारी गाव, त्या खाली नदी आणि समोर जणू स्वर्गात डोकावणारे उंच डोंगर. आमच्या खोल्या गच्चीवर होत्या.

सारी च्या हॉटेल मधून दिसणारी पर्वतराजी.

संध्याकाळी फर्मास कॉफीबरोबर घरुन आणलेला खाऊ खात खात, गप्पा हाणत समोरचे डोंगर बघत बसायचं. ह्या सारखं दुसरं सुख नाही. खाडे काकांनी त्यांच्या हॉस्टेलमधला भारी गेम सांगितला. 1 तास शुद्ध मराठीत बोलायचं. फाऊल झाला की 1 रुपया पेनल्टी. हसून हसून पुरी वाट लागली. आर्यनचा शब्दकोश तासाभरात श्रीमंत झाला. रात्रीचं जेवण येईपर्यंत दमशेराजचे कैक राऊंड झाले.

रात्री "देवरिया ताल" ट्रेकची स्वप्न बघत झोपून गेलो. अजून एक छोटेखानी पण सुंदर ट्रेक झोळीत पडणार होता.

२४ तासांमधले सर्व तास सुंदर जाण्याचं आक्रित फक्त हिमालयातच होऊ शकतं. कालचा सगळा दिवस अगदी तसा होता. आज थोडं लवकर उठलो. जगातलं भारी ब्रेड ऑमलेट खाल्लं, फर्मास कॉफी घेतली आणि सगळे देवरिया तालला निघालो.

आमच्या हॉटेल पासून 50 पावलांवरून ट्रेक सुरु होत होता. एकच रस्ता आणि तो सुद्धा तुंगनाथच्या ट्रेक रूट सारखा घडीव त्यामुळे चुकायचा प्रश्न नव्हता. कमी वेळात बऱ्यापैकी वरती आलो होतो पण अजून बरीच चढण बाकी होती. खालून उंच दिसणारा डोंगर प्रत्येक पावलागणिक छोटा न होता, ब्रम्हांडासारखा प्रसरण पावत मोठा मोठाच होत होता.

आम्हाला वेळेचं बंधन नव्हतं, त्यामुळे चालण्यात गती नव्हती. प्रत्येक झाड-पान मनापासून निरखत, कापसासारख्या ढगांचे वेगवेगळे आकार ठरवत चालताना मज्जाच येत होती. प्रत्येक पावलाचा आनंद घेत सगळे निवांत चालत होते, आपापल्या धुंदीत! असे घड्याळाच्या कोलुतून सुटलेले मोजके क्षण काय ते आयुष्य! कृष्ण कृपेमुळे अशाच कैक क्षणांनी जीवन समृद्ध झालं आहे.

देवरिया ताल

पक्ष्यांबरोबर शलाका आणि प्राजक्ताची ड्यूएट गाणी सुरू झाली. एक स्वच्छंदी झरा रानातून वाहत होता. चढताना अचानक सामोरा यायचा आणि अचानक गिरकी घेत परत झाडीत लुप्त व्हायचा. जणू आमच्याबरोबर लपाछपी खेळत होता. फुलपाखरं फुलांभोवती पिंगा घालत होती. दोघांचीही आयुष्यं हाताच्या बोटांवर मोजण्याइतकी, पण त्याची न खंत न भीती. त्यांच्या मानगुटीवर भूत-भविष्यकाळाची जोखडं नाहीत म्हणून भीतीचा आणि दुःखाचा लवलेश नसावा. आता चढ सौम्य झाला म्हणजे तलाव जवळ आल्याची खूण. बरेच अंतर चालल्यावर आधी समोरच्या हिरव्या डोंगराआड हिमाच्छादित डोंगर दिसला आणि समोर बशीसारख्या खोलगट भागात "देवरिया ताल" - शांत आणि निश्चल. आमच्याशिवाय आठवा माणूस सगळ्या परिसरात नव्हता. तलावाच्या बाजूनी झाडं फेर धरुन उभी होती. डोंगर, आकाश आणि झाडं तलावाच्या पाण्यात स्वतःच प्रतिबिंबं पाहत होती. तलावाच्या बाजू-बाजूने, दाट झाडीतून एक प्रदक्षिणा मारली आणि झाडाच्या सावलीत, गवतावर शरीर झोकून दिलं. सगळे किती वेळ पडून होतो माहित नाही. 'सुकून' होता त्यात!

देवरिया ताल trail
निर्झर

खाली उतरायला सुरुवात केली. जेवायच्या वेळेपर्यन्त खाली आलो. खऱ्या पुणेकरांची जेवायची आणि वामकुक्षीची वेळ कधी चुकत नाही. दुपारची पडी झाली. उन्हं उतरायला लागली, तसे सगळे गच्चीत आलो. लहानपणी चित्र रेखाटायचो तसे समोर डोंगर होते, डोंगरावर ढग होते, घरं होती, दरी आणि त्यातून वाहणारी नदी पण होती. शिवाय तेव्हा चित्रात न जाणवणारी शांतता पण होती. संध्याकाळी फेरफटका मारायला सगळे बाहेर पडलो. संध्याकाळचा थंड वारा अंगावर घेत, गप्पा मारत उखिमठच्या दिशेने रस्त्यावरून चालत होतो. 'पुढच्या वळणाला मागे फिरू' म्हणे म्हणे पर्यंत खूप वळणं मागे टाकली.

हॉटेलवर येऊन कॉफी पित समोरचे डोंगर बघत बसलो. आता उद्यापासून परतीचा प्रवास सुरू. दोन दिवसांत जेवढं शक्य होतं, तेवढं पदरात पाडून घेतलं. पंचमहाभूतांमधलं एक महाभूत 'अवकाश' मला सगळयात prominent वाटतं. सगळयांना सामावून घेण्याची ताकद त्यात आहे. ती space व्हॅलीनी आमच्यासाठी तयार केली नव्हती. पावसाचा हाहा:कार हे निमित्त होतं. ती space तुंगनाथ आणि देवरिया तालनी आमच्यासाठी केली होती म्हणूनच ध्यानीमनी नसताना दोन सुंदर ट्रेक ओंजळीत आले.

आपलं काम रथात बसण्याचं. 'तो' फिरवेल तिथे आनंदानी फिरावं. कारण आपण स्वतःहून कुठे जात नाही, जाऊच शकत नाही, नेले जातो....

|| श्रीकृष्णार्पणमस्तु ||

Write a comment ...

Write a comment ...

Trinity Outdoors & Tours

Pro
Trinity Outdoors and Tours organise one day and overnight treks, adventure activities, children camp and pilgrim and leisure tours. We determined to become leading company in tourism with business ethics and loyalty.